ईशान्य नायजेरियाच्या माइदुगुरी शहराजवळ बोको हरामच्या दहशतवाद्यांनी भाताच्या शेतात काम करणाऱ्या ४३ शेतमजुरांची निर्घृणपणे मानेवर धारदार शस्त्र चालवून हत्या केली आहे. या हल्ल्यात ६ मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. माहितीनुसार या हल्लेखोरांनी आधी या मजुरांना बांधलं आणि नंतर कोशोबे गावांत त्यांची मानेवर धारदार शस्त्र चालवून हत्या केली.
नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत म्हटले आहे की या अतिशय क्रूर हत्याकांडाने पूर्ण देशाला वेदना झाल्या आहेत. मिलिशियाचे नेते बाबाकुरा कोलो यांनी म्हटले आहे की त्यांनी ४३ मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि ६ मजुरांची अवस्था गंभीर आहे. ते म्हणाले, ‘यात काहीही शंका नाही की बोको हराम या भागात सक्रीय आहे आणि शेतकऱ्यांवर अनेकदा हल्ला करते.’ शेतमजुरांवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना त्यांनी बोको हरामला थोपवणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे देखील म्हटले आहे.
पीडित लोक हे आग्नेय नायजेरियाच्या सोकोतो राज्यातील मजूर होते जे साधारण १,००० किलोमीटर दूर कामाच्या शोधात आले होते. या मजुरांनी काम शोधत ईशान्येचा प्रवासही केला होता. इब्राहिम लिमन या जवानाने सांगितले, ‘६० शेतकऱ्यांना भाताच्या शेतांमध्ये कापणी करण्यासाठी तिथे नेमले होते. यापैकी किमान ४० लोकांची हत्या केली गेली तर ६ लोक जखमी होते.’ त्याने सांगितले कि अन्य आठ जण बेपत्ता आहेत.