Sinhagad Fort

सिंहगड किल्ला- सिंहगड किल्लाचे मुळ नाव कोंढाणा

गडकिल्ले गिरिदुर्ग

सिंहगड किल्ला : सिंहगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे आणि हा पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इतिहास :

हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदेभान राठोड याने नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते. शिवाजी महाराजांच्या  काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” हे वाक्य उच्चारले. परंतु सिंहगड हे नाव आधीपासुनच होते. इतिहासकार श्री.ग. ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव ‘सिंहगड‘ झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह. ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे.

शिवाजी महाराज जेव्हा आग्ऱ्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले. या युद्धाबाबत सभासद बखरी उल्लेख आढळतो, “तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने  ‘कोंडाणा आपण घेतो, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, मशाल , चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालुन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. एक प्रहर मोठे युद्ध झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा, याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरलेले राजपूत मारिले आणि किल्ला काबीज केला.”

माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, ‘गड आला, पण सिंह गेला‘.

माहिती :

उंची  :  ४४००फुट.
प्रकार  :  गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी  :  मध्यम
ठिकाण  :  पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव  :  सिंहगड
डोंगररांग  :  भुलेश्वर
सध्याची अवस्था  :  जीर्ण

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

  1. दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते ते दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
  2. टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
  3. कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
  4. श्री अमृतेश्वर भैरव मंदिर : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती.
  5. देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
  6. कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
  7. उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.
  8. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
  9. डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले.
  10. राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ. स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले.
  11. सुभेदार तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. ‘सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले. दरवर्षी माघ नवमीस येथे सुभेदार तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

गडावर जाण्याच्या वाटा
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.

मार्ग : स्वारगेट पुणे – आनंदनगर – वडगांव – खडकवासला – सिंहगड पायथा.

स्वारगेट पासून ५० क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.

  1. पुणे-कोंढणपूर : पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यानंतर आपला गडावर प्रवेश होतो.
  2. पुणे दरवाजा : पुणे-सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यानंतर आपला गडावर प्रवेश होतो.

गडावर राहण्याची सोय नाही. गडावर जेवणाची सोय होते. देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी बारामहिने पुरते. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.

गूगल मॅप (सिंहगड किल्यावर  जाण्याचा मार्ग ) :

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत