गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला होता. ही माहिती स्वतः त्यांनीच दिली आहे. हा विषप्रयोग कुणी केला? हे मला कळलं होतं पण माझ्याकडे पुरावा नव्हता असं देखील लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.
१९६२ मध्ये लता दीदी यांना ‘बीस साल बाद’ सिनेमासाठी एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं. परंतु रेकॉर्डिंग करण्याच्या काही तास आधी लतादीदींची तब्येत अचानक बिघडली. त्यांची तब्येत एवढी खालावली की त्यांना हलताही येऊ शकत नव्हतं. डॉक्टरांना तातडीने बोलावून घेण्यात आलं. जवळपास तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर लता दीदी यांना थोडं बरं वाटू लागलं. याचवेळी डॉक्टरांना लता दीदी यांच्यावर जेवणातून विषप्रयोग करण्यात आल्याचं सांगितलं.
लता मंगेशकर जवळपास तीन महिने अंथरुणात होत्या. अशा परिस्थितीत बहीण उषा मंगेशकर यांनी स्वत: स्वयंपाक करण्याचं ठरवलं. दीदी म्हणाल्या की, ‘या प्रकरणाबद्दल आम्ही मंगेशकर फारसं बोलत नाही. कारण आमच्यासाठी तो फारच वाईट काळ होता. पण मी गाऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी कधीच सांगितलं नाही. या सगळ्या अफवाच आहेत. उलट माझे डॉक्टर आर.पी कपूर यांनी उत्तमरित्या माझ्यावर उपचार केले. मी लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभी रहावी म्हणून प्रयत्न केले. त्यांनी पुढे सांगितलं कि, माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळलं होतं. पण त्या व्यक्तीविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही, कारण आमच्याकडे काही पुरावा नव्हता.