चंदिगड : ‘जुग जुग जिओ’ सिनेमाचे शूटिंग चंदिगडमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या सेटवर सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता, वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अनिल कपूर आणि प्राजक्ता कोळी या दोघांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी आणखी एक चाचणी होणार असल्याचे वृत्त आहे.
सेटवर एकदम १९ जणांना कोरोना झाल्यामुळे शूटिंग ताबडतोब थांबवण्यात आले. सेटवरील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय झाला आहे. सेटवर कार्यरत असलेल्यांपैकी कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले. ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांवर उपचार सुरू आहेत.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘जुग जुग जिओ’ या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी, मनीष पॉल, प्राजक्ता कोळी हे कलाकार आहेत. कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन शूटिंग सुरू होते. सेटवर नेमक्या कोणत्या व्यक्तीमुळे कोरोनाचा फैलाव झाला हे अद्याप लक्षात आलेले नाही.