मुंबई : अभिनेता आशिष रॉय यांचे आज (24 नोव्हेंबर) दुःखद निधन झाले आहे. मुत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिनेता आशिष रॉय, मागील काही काळापासून मुंबईच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांनी उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसांपूर्वी आशिष यांनी आपल्या वाढदिवशी एक व्हिडीओ चित्रित केला होता. यात आशिष रुग्णालयीन खर्चासाठी मदत मागताना दिसले होते. यावेळी केवळ अभिनेता अनुप सोनी आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मदतीचा हात पुढे केला होता. डायलासिसनंतर त्यांची किडनी पूर्णपणे खराब झाली होती. पैसे नसल्याने त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट करण्यास नकार दिला होता.
व्हिडीओत आशिष म्हणाले होते की, ‘वाईट काळात कोणीही सोबत नसते. या वाईट काळात माझ्याबरोबर कोणीही नाही. मी एकटाच होतो. कोलकात्यात लग्न झालेली एक बहीण आहे. नेहमी तीच मला मदत करते. पण, लॉकडाऊनमुळे ती माझ्यापर्यंत पोहचू शकत नाही. ती कोलकात्यात अडकली आहे. गेल्या 8 महिन्यांपासून काहीच काम नाहीय. औषध-उपचारांवर तब्बल 4 लाख खर्च झाले आहेत. आता कोणाकडून मदतही मिळत नाही आणि जवळचे पैसेदेखील संपले आहेत.’