अभिनेत्री पूनम पांडे हिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ करणं महागात पडलं आहे. गोवा पोलिसांनी याप्रकरणी आज (गुरुवार) तिला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, चौकशीनंतर तिला अटक देखील करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक कोर्टात हजर करुन तिच्या कोठडीची देखील पोलिसांकडून मागणी केली जाऊ शकते.
गोव्यातील अगौंदा रिसॉर्टमधून पूनम पांडे हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणी फोटो शूट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडे हिने गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ शूट केलं होतं. पूनम पांडे हिच्यासह तिचा पती सॅम बॉम्बे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारण जेव्हा हे शूट सुरु होतं तेव्हा सॅम हा तिथेच उपस्थित होता.
दोन साध्या वेषातील पोलीस देखील यावेळी तिथे हजर होते जे पूनमला संरक्षण देत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोन्ही पोलिसांना देखील याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. तसंच धरणावर असणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. या संपूर्ण व्हिडिओ शूटप्रकरणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला विंगने पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.