खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. तिचा पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनंतर तीन महिन्यांनी मयुरी नवी सुरुवात करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून या मालिकेच्या निमित्ताने तिने हिंदीत पदार्पण केलं आहे. यामध्ये ती अभिनेता गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
‘फोर लायन्स’ निर्मिती संस्था ‘इमली’ ही मालिका घेऊन येत आहे. ही मालिका हिंदी भाषेत असून यात गश्मीर आणि मयुरी असे दोन मराठी चेहरे झळकणार आहेत. मयुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ‘तुम्हा सर्वांनी माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी कृतज्ञ आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमातूनच नवी ऊर्जा मिळवत मी नवीन सुरुवात करतेय. पुन्हा तुमच्या शुभेच्छांची मला गरज आहे’, असं तिने हा प्रोमो शेअर करत म्हटलं आहे.
मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने नैराश्यातून जुलैमध्ये नांदेड इथल्या त्यांच्या घरी आत्महत्या केली होती. पतीच्या आत्महत्येचं दु:ख सावरत मयुरी आता पुन्हा एकदा नवी सुरुवात करत आहे.