बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज तिच्या सकारात्मक विचारसरणीतून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच जॅकलिनने आपल्या स्टाफमधील एका सदस्यासाठी दसरा संस्मरणीय बनवला तेव्हा हे पुन्हा पाहायला मिळाले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जॅकलिनने तिच्या स्टाफमधील एका सदस्यास भेट म्हणून गाडी दिली आहे.
जॅकलिनच्या स्टाफमधील हा सदस्य तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून तिच्यासोबत आहे. जॅकलिनने कार बुक केली तेव्हा ती गाडी कधी दिली जाईल हे तिला स्वतःलाच ठाऊक नव्हते. पण ती गाडी नेमकी दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळाली. त्यावेळी जॅकलिन शूट करत होती. म्हणूनच ती गाडीची पूजा करताना वाहतूक पोलिस निरीक्षकाच्या गणवेशात दिसली.
यापूर्वी जॅकलिनने तिच्या मेकअप आर्टिस्टला देखील कार गिफ्ट केली होती आणि ती तिच्या स्टाफमधील तसेच तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या या स्वभावामुळे ओळखली जाते.