अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविकला सशर्त जामीन मंजूर केला आहे. रिया चक्रवर्तीसह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली होती. त्यावरून एनसीबीनं तपास सुरू केला होता. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने शौविक व सॅम्युएलला समन्स बजावले होते. सॅम्युएल हा दलालांकडून अंमली पदार्थांचा साठा मिळवून तो शौविकमार्फत रियाला पुरवत होता. रिया सॅम्युएल व शौविकच्या सल्ल्यानुसार ते अंमली पदार्थ सुशांतसिंहला छुप्या पद्धतीने देत होती. यामुळे अधिक तपासासाठी एनसीबीने अटकेची कारवाई केली होती.
तब्बल तीन महिन्यांनंतर शौविकला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर रिया देखील महिनाभार भायखळ्याच्या तुरुंगात होती. रियाला जामीन मिळाला असताना शौविक ड्रग्ज डिलर्सच्या थेट संपर्कात होता, असं कारण देत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता.