पुणे: राज्य सरकारनं 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरु करण्याची तयारी पुणे महापालिका करत आहे. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठमधील उर्दू शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे.
पुणे महापालिकेमधील भवानीपेठेतील उर्दू शाळेतील एका शिक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शाळा सुरु होण्याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. पुणे महापालिकेच्या शाळेत माध्यमिक विभागाचे एकूण 230 शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात अजून काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर शाळा बंदच ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.