ठाणे : ठाणे जिल्ह्यात एका १३ वर्षीय कर्करोग पीडित मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी, पोलिसांनी २९ वर्षीय आरोपीला गुरुवारी बिहारमधून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब आणि आरोपी बिहारमधील एकाच गावातील आहेत. ही मुलगी बिहार राज्यातून महाराष्ट्रात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी आली होती. आरोपीने दोन महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये त्यांच्यासाठी भाड्याने राहण्याची व्यवस्था केली होती. आरोपीने तिच्या उपचारात मदत केली होती. मात्र, यादरम्यान, मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला आणि अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
मुलगी कर्करोगपीडित असल्याने मुंबईतील एका रुग्णालयात केमोथेरपी घेत होती. दरम्यान, नियमित तपासणीत ती गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहिताच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.