पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काल रुबी हॉल रुग्णालयात गेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे एक प्रभावी वक्तृत्व व समर्पित नेता काळाच्या पडद्याआड गेला. भालके कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!@NCPspeaks pic.twitter.com/PHNjBj44wb
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 28, 2020
ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. तेव्हापासून भारत भालके त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते व्हेंटिलेटर होते. अखेर शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.